पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लाक्षणिक धरणा आंदोलन

Photo of author

By Sandhya

Symbolic sit-in protest for the fair rights of contract workers in Pune Metro

शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची भारतीय मजदूर संघाची ठाम मागणी*
पुणे :
पुणे मेट्रो प्रकल्पात कार्यरत कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय वेतन दर, रजा, सामाजिक सुरक्षा व सन्मानजनक वागणूक यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. शासनाचे स्पष्ट निर्णय व कामगार कायदे अस्तित्वात असतानाही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो रेल कामगार संघ (रजि. नं. पी.एन. 5299), संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने पुणे मेट्रोतील सर्व कंत्राटी कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी लाक्षणिक धरणा आंदोलन मेट्रो प्रशासना कार्यालय येथे करण्यात आले . या आंदोलनात अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस (भारतीय मजदूर संघ) सचिन मेंगाळे यांनी मार्गदर्शन करताना ” महाराष्ट्र सरकार चा दि 18 /02/2025 चा शासन निर्णय तात्काळ अंमलात आणण्यात येवुन सर्व कामगारांना केंद्रीय वेतन दरानुसार लाभ देण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे .

महत्त्वाची ठळक बाब
मा. कामगार मंत्री आकाश पुंडकर यांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांना केंद्रीय वेतन दरानुसार फरकासह वेतन देण्याबाबत स्पष्ट शासन निर्णय दिलेला आहे. मात्र सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी आजतागायत पुणे मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
या शासन निर्णयाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी पुणे मेट्रो रेल कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याच अनुषंगाने मा. अपर कामगार आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयात अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली होती.
मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे या बैठकीस महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडील एकही जबाबदार अधिकारी उपस्थित राहिला नाही, ही बाब प्रशासनाची कामगारांबाबतची उदासीनता स्पष्टपणे दर्शविते.
कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्या
कंत्राटी कामगारांना शिल्लक रजेचे वेतन तात्काळ देण्यात यावे.
राष्ट्रीय सणांच्या दिवशी काम केल्यास दुप्पट वेतन देण्यात यावे.
प्रत्येक कामगाराला दरमहा पगाराची स्लिप देणे बंधनकारक करण्यात यावे.
महिला तक्रार निवारण समितीमध्ये कामगार प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात यावे.
सर्व कामगारांना सन्मानाने व मानवीय वागणूक देण्यात यावी.
ओव्हरटाइम केल्यास त्याचे कायदेशीर दराने वेतन देण्यात यावे.
महिला कर्मचाऱ्यांसाठी कामावर ये–जा करण्याची सुरक्षित व्यवस्था करण्यात यावी.
विनाकारण बदल्या व शिफ्ट बदल तात्काळ थांबविण्यात यावेत.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करणे त्वरित थांबविण्यात यावे.
मेट्रोमध्ये भरती करताना अनुभवी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांना पदोन्नती देण्यात यावी.
पुणे मेट्रोतील सर्व कामगारांना केंद्रीय वेतन दरानुसार फरकासह वेतन देण्यात यावे.
संघटनेचा इशारा
कामगारांच्या वेतनाशी, उपजीविकेशी व सन्मानाशी संबंधित शासन निर्णयांची अंमलबजावणी त्वरित न झाल्यास, आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे , भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, पुणे मेट्रो रेल कामगार संघ अध्यक्ष राम सुरवसे , पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सेक्रटरी सागर पवार, संघटन सचिव उमेश विश्वाद, यश निंबाळकर , सुर्वणा भोसले , निकाता दंडवते, अर्पिता काळे यांनी मार्गदर्शन केले . हे आंदोलन पूर्णतः कायदेशीर, शांततामय व कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे.
देश के हित में करेंगे काम,
काम का लेंगे पूरा दाम!
भारतीय मजदूर संघ जिंदाबाद!
पुणे मेट्रो रेल कामगार संघ जिंदाबाद! या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता

Leave a Comment

You cannot copy content of this page