काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप काल रविवारी मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर झाला. यावेळी इंडिया आघाडीचे सर्व नेते मंडळी येथे उपस्थित होते. यावेळी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री, आरजेडी प्रमुख तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
याशिवाय त्यांनी महाराष्ट्र सरकारवर देखील सडकून टीका केली. तेजस्वी यादव म्हणाले, “बेरोजगारी, महागाई, गरिबी हे आपले सर्वात मोठे शत्रू आहेत. पण यावर चर्चा होत नाही.
पंतप्रधान मोदी समुद्रात तळाशी जातात, चटईवर बसतात, त्याची मात्र जोरात चर्चा होते. पण शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची चर्चा होत नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही घाबरणार नाही, जनतेसाठी लढत राहू. उद्या सत्तेत आलो नाही तरी आपण जनतेत जाता आलं पाहिजे. ”
महाराष्ट्र सरकारबाबत तेजस्वी यादव म्हणाले की, “महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले नेते लीडर नाही तर डिलर आहेत. शरद पवारांच्या नावावर ज्यांनी मतं मागितली, ते भाजपाला जाऊन मिळाले.
राहुल गांधींच्या नावावर मतं मागून काही लोक भाजपात गेले. तसेच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नावावर मतं मागणारेही भाजपाला जाऊन मिळाले. यासाठी मी म्हणतो महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही डिलर आहेत.”
नितीश कुमार यांची गॅरंटी द्या नितीश कुमार यांच्यावर टीका करताना तेजस्वी यादव म्हणाले, “भाजपवाले महाराष्ट्रात तर आमदारांना घेऊन गेले, बिहारमध्ये तर माझ्या काकांनाच घेऊन गेले.
तुम्हाला जी गॅरंटी द्यायची ती द्या, पण ते आमच्या काकांची गॅरंटी देऊ शकतील का? परंतु काका गेले तरी पण बिहारची जनता आमच्याबरोबर आहे. सर्व्हेमध्ये काहीही दाखवू द्या, पण बिहारमध्ये सर्वांना आश्चर्यचकीत करणारा निकाल दिसेल,” असा विश्वास देखील तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला.