मनोज जरांगे यांनी 8 जूनपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाविरोधात बोलला तर आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार, असे जरांगेंनी म्हंटले आहे.
काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी आज अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली. या भेटीवर बोलताना जरांगे म्हणाले, “ते कशासाठी आले होते, मला माहीत नाही. काँग्रेसने मराठ्यांची मते घेतली, निवडून आले. तर आमच्या विरोधात वडेट्टीवार बोलतात. त्याबद्दल मी काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.”
मराठा आरक्षणाविरोधात बोलल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार. एकीकडून मराठा समाजाची मते घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात बोलायचं पुन्हा असं केलं तर विधानसभेला सगळा उलटफेर करू,” असंही जरांगे म्हणाले.
“सरकार आमच्या मागण्यांबाबत दुटप्पीपणा करत आहे. आता यांची थोडी फजिती झाली. विधानसभा निवडणुकीत जास्त फजिती होईल” असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, अर्चना पाटील, सुधाकर शृंगारे हे युतीचे उमेदवार पराभूत झाले. तर जालन्यात काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी पाच टर्म खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचा तब्बल 1 लाख 9 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला बसल्याचे दिसते.