
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर आज गुरुवार दि.०२ ला दुपारी सुमारे १२ ते साडे बाराच्या दरम्यान चारचाकी व दुचाकींचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघे जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस जमादार देवीदास खेडकर यांनी बोलताना दिली.
याबाबत टाकळी हाजी पोलीस खेडकर यांचेकडून मिळालेल्या माहिती नुसार आज दुपारी साडेबाराच्या आसपास अष्टविनायक महामार्गावरून ३ जण दुचाकीवरून कवठे येमाई बाजूकडे चाललेले असताना ईचकेवाडी जवळ खार ओढ्याच्या वळणावर समोरून आलेल्या चार चाकी वाहन व दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात २ जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमी ला पुढील उपचारासाठी व ठार झालेल्या दोघांना पी. एम. साठी तात्काळ शिरूर येथे हलविण्यात आले. तर यात सुपर कॅरी गाडी नं Mh 14 के क्यू 4017 व हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटर सायकल नंबर MH 14 JQ 8931 यांचा अपघात झाला असून अपघातातील जखमीला पुढील उपचारकामी शिरूर या ठिकाणी पाठविण्यात आली असल्याची व अपघातग्रस्त दोन्ही वाहने टाकळी हाजी दूर क्षेत्र या ठिकाणी लावण्यात आली असल्याची माहिती खेडकर यांनी दिली.
दरम्यान हा अष्टविनायनक महामार्ग वेगवान झाल्याने इचकेवाडी जवळील खार ओढ्या जवळच्या वळणावर येणारी जाणारी वाहने अतिशय वेगात जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. ओढ्याच्या दोन्ही बाजूस तात्काळ गतिरोधक करण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांतून व्यक्त होत आहे.