
धाराशिव : बसवकल्याण – तुळजापूर एसटी बसने अचानक पेट घेतली. याप्रसंगी चालकाच्या सर्तकतेमुळे बसमधील ७० प्रवाशी बाल बाल बचावले. ही घटना लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेटवर शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता घडली आहे.
तुळजापूर आगाराची एसटी बस रोज दुपारी साडेतीन वाजता तुळजापुरहून लोहारामार्गे बसवकल्याणला मुक्कामी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बसवकल्याणहून ही बस परत लोहारा मार्गे तुळजापूरला जाते. शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही एसटी बस बसवकल्याणहून निघाली सकाळी पावणे नऊच्या सुमारास लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेट समोर प्रवासी उतरण्यासाठी व चढण्यासाठी थांबली. याप्रसंगी प्रवासी गाडीत बसल्यानंतर बस चालक एम. व्ही. घंटे यांनी बस सुरू करताच बसच्या कॅबीनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच. चालक घंटे यांनी प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यातच बसच्या कॅबिनमध्ये जाळ लागला. चालक घंटे यांच्या सर्तकतेमुळे बसमधील ७० प्रवाशी बालबाल बचावले.
याप्रसंगी तात्काळ लोकमंगल साखर कारखान्याचे अग्निशामक गाडी आल्याने आग आटोक्यात आली. या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसच्या साह्याने तुळजापुरला सोडण्यात आले. या घटनेची माहिती वाहक बी.ए.गोरे यांनी लोहारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक तुकाराम घोडके यांना दिली. असता वाहतूक नियंत्रक घोडके यांनी लोहारा पोलीस ठाण्यात माहिती दिली.