लाडक्या बहिणींवरील कारवाईवर मुख्यमंत्री पहिल्यांदाच बोलले, देवेंद्र फडणवीस म्हणाले – “नवीन निकष नाही, आधीच्या नियमांनुसारच कारवाई”

Photo of author

By Sandhya


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी आता राज्य सरकारकडून केली जात आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. आतापर्यंत 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. अनेक महिलांनी समोरुन आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर काही ठिकाणी सरकारकडून अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीदेखील याबाबत माहिती दिली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कुठलेही नवीन निकष नाहीत. योजना घोषित केली त्यावेळी जे निकष होते, त्या निकषांपेक्षा वेगळे ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होत आहे. मला आनंद आहे की, आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे की, आम्ही निकषांच्या बाहेर गेलो आहोत, त्यामुळे आम्ही या योजनेचा लाभ आम्ही सोडत आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार?
“आम्ही कुणाचेही पैसे परत घेतले नाहीत. तसेच पैसे परत मागणारही नाहीत. पण आम्हीही जनतेच्या पैशांचे कस्टोडियन आहोत. आम्हालाही महालेखाकाराला म्हणजेच CAG ला उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे नियमाच्या बाहेर कुणाला फायदा पोहोचत असेल तर त्यावर CAG चा आक्षेप येणारच आहे. त्यामुळे जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल. त्याची सुरुवात आम्ही केली आहे. कुठलेही नवीन निकष नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

महिला आणि बालविकास मंत्री काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीदेखील स्पष्ट केलं. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी”, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

अपात्र ठरविण्यात आलेल्या महिलांचे विवरण खालीलप्रमाणे :
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
एकुण अपात्र महिला – ५,००,०००

Leave a Comment

You cannot copy content of this page