शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला

Photo of author

By Sandhya

The guiding link connecting education, politics, and social work has been unraveled.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 2: विद्वत्ता, तत्वनिष्ठ आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. डॉ. वाघमारे यांचा इंग्रजी भाषा आणि साहित्यासह अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचा सखोल अभ्यास होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अध्यापन आणि प्रशासन या अंगाने मोठा ठसा उमटवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केले. विशेष म्हणजे त्यांनी लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदही भुषविले. या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी लातूर व्हिजन म्हणून आराखडा तयार केला. शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा तसेच नागरी सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यामुळे लातूरला त्यावेळी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कारदेखील मिळाला होता. राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी विविध संसदीय समितीवर काम केले. लातूरचे किल्लारी भूकंपशास्त्र संशोधन आणि नांदेड – किनवटच्या आदिवासी संशोधन आणि अभ्यास केंद्रांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात भारताच्या प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून म्हणणे मांडण्याची संधी मिळाली होती. त्यांनी वैविध्यपूर्ण विषयांवर विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांची ही ग्रंथसंपदा आपल्या सर्वांसाठी एक प्रकारचे संचित आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे. ही सामाजिक क्षेत्राची हानी आहे. आपण वाघमारे कुटूबिंयाच्या दुःखात सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची क्षमता द्यावी अशी प्रार्थना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page