चाकणला कचऱ्याच्या दुर्गंधीने प्रवाशांचा कोंडतोय श्वास,

Photo of author

By Sandhya

The stench of garbage in Chakan is making the passengers’ breath difficult,


बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर गेल्या दहा वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेले चाकण एसटी बस स्थानक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. बस स्थानक परिसरात कचऱ्यामुळे बकालपणा वाढत चालला असून, वाढत्या दुर्गंधीने प्रवाशांचा श्वास कोंडू लागला आहे. असुविधांचे आगर म्हणून प्रख्यात असलेले चाकण एसटी बस स्थानक हे असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून चाकण एसटी बस स्थानकात पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. स्वच्छता गृह बंद असते. बस स्थानकालगत कचऱ्याचे मोठमोठे ढिग साचलेले दिसत आहेत. कचऱ्यातून सुटलेली दुर्गंधी असे चित्र सध्या चाकण एसटी बस स्थानकावर दिसून येत आहे. असुविधांचे अगर म्हणून चाकण एसटी बस स्थानक सध्या समस्यांच्या गर्तेत अडकलेले आहे. या सर्व गैरसोयींमुळे प्रवासी हैराण झाले असून, स्थानका लगतचा कचरा कोण उचलणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

चाकण एसटी बस स्थानकाच्या इमारतीत व्यवसायिक गाळे आहेत. बस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्यातून सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे प्रवासी व येथील नागरिकांचा श्वास कोंडू लागला आहे. येथील स्वच्छतागृह कधी चालू तर कधी बंद असते. त्यामुळे महिलांसह सर्वच प्रवाशांची गैरसोय होते. चाकण लगतच्या नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने स्थानकाजवळील कचरा बऱ्याच वेळा उचलला आहे. परंतु बस स्थानकाच्या आवारातील कचरा एसटी महामंडळाने, तसेच संबंधित बांधकाम विभागाने उचलणे अनिवार्य आहे. मात्र या एसटी बस स्थानकाच्या इमारती लगतचा कचरा उचलण्यावरून महामंडळाचे अधिकारी, व ग्रामपंचायत यांच्यात तू तू मै मै होत आहे. नागरिकांना व प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

” चाकण एसटी बस स्थानका लगत प्रवाशी व नागरिकांनी कचरा टाकणे चुकीचे आणि घातक आहे. चाकण स्वच्छ आणि सुंदर राहण्याकरता सर्वांचा सहभाग व पुढाकार आवश्यक आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.”

Leave a Comment

You cannot copy content of this page