मोदी–मॅक्रोन भेटीच्या पार्श्वभूमीवर आज दक्षिण मुंबईत वाहतूक बदल

Photo of author

By Sandhya

Traffic changes in South Mumbai today in view of Modi-Macron meeting

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यानिमित्त दक्षिण मुंबईतील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान दुपारी २.१५ वाजता मुंबईत दाखल होणार असून त्यानंतर दुपारी २.३० वाजता ‘लोकभवन’ (माजी राजभवन) येथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता दोन्ही नेते ताजमहाल पॅलेस, मुंबई येथे विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत राऊंडटेबल चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता गेटवे ऑफ इंडिया परिसरात ‘इंडो-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन’ अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते २२ फेब्रुवारीदरम्यान सुरू असलेल्या या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम १७ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासातर्फे त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

व्हीव्हीआयपींच्या उपस्थितीमुळे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व श्यामाप्रसाद मुखर्जी चौक हे मार्ग बंद राहतील, मात्र आपत्कालीन वाहनांसाठी ते खुले असतील. तसेच नॉर्थ कोर्ट ते अ‍ॅडम स्ट्रीट जंक्शनदरम्यानचा पी. रामचंदानी मार्गही वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रिगल जंक्शनकडे येणारी वाहने शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड आणि बी.के. बोमन बेहराम रोडकडे वळवण्यात येतील. पी. रामचंदानी मार्गावरील वाहतूक अल्वा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड आणि जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. अ‍ॅडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड तसेच बेस्ट बस थांबे तात्पुरते बंद राहतील.

या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले

Leave a Comment

You cannot copy content of this page