राज्य शासनाने 1 जूनपासून ऑनलाइनवर रेशन कार्ड देण्याचा शुभारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर खेड तहसील कार्यालयात नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी कागदपत्रांसह प्रस्ताव देण्याची पध्दत बंद करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली. नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्जासह कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
त्यामध्ये संपूर्ण माहिती भरून दिल्यानंतर संबंधितांची तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतून पूर्ण पडताळणी केल्यानंतर ऑनलाइनच रेशन कार्डची प्रत काढून मिळणार आहे.
थोडक्यात, ही प्रत म्हणजेच ई-शिधापत्रिका यापुढे पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. यापुढे ऑफलाइन पध्दतीने नवीन रेशनकार्डासाठी प्रस्ताव घेतले जाणार नाहीत. 1 जूनपूर्वी ज्या नागरिकांनी नवीन रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत.
त्यांचे नवीन रेशन कार्ड तयार करून दिले जाणार आहे. आता ई-शिधापत्रिका मिळविण्यासाठी नागरिकांची होणारी कुंचबणा टळणार असून, वेळेची बचत होणार आहे. तसेच तहसीलदार कार्यालयाचीही एजंटगिरीच्या विळख्यातून मुक्तता मिळणार आहे.