उदय सामंत : बारसू-नाणार आंदोलकांवरील हिंसक गुन्हे सोडून इतर गुन्हे मागे घेणार…

Photo of author

By Sandhya

उदय सामंत

नाणार येथे बॉक्साईट संदर्भात केंद्र शासनाने निर्देश दिल्यानुसार होणाऱ्या सुनावणीबाबत प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थिती पाहून वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा अशा सूचना देतानाच ही सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत दिले असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नाणार येथील आंदोलकांवर दाखल केलेले हिंसक गुन्हे सोडून इतर गुन्हे मागे घेत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

राजापूर तालुक्यातील पांगरी खुर्द नळपाणी योजना तसेच पुनर्वसन विषयाबाबत पालकमंत्री सामंत म्हणाले, स्वच्छ आणि मुबलक पाणी ग्रामस्थांना मिळण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे यांनी एकत्रितरित्या ग्रामस्थांसोबत बैठक घेवून, ग्रामस्थांचा विषय तात्काळ मार्गी लावावा.

प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव द्यावा. पंचवीस लाखांचे अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने बनवावे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात बैठक घ्यावी असे निर्देश देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

गडनदी प्रकल्पाबाबतही ग्रामस्थांची बैठक घेण्यात येणार आहे. आरजीपीबीएल नावाने दाभोळ वीज प्रकल्प सुरु आहे. २०१९ पासून कर्मचाऱ्यांची थांबविलेली पगारवाढ कंपनीने तात्काळ द्यावी. सहायक आयुक्त कामगार, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामगारांची जी थकबाकी द्यावी लागते त्याबाबत तात्काळ तोडगा काढून थकबाकी अदा करावी अशा सुचना करण्यात आल्या आहेत.

तसेच ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभे केले, ज्यांच्या जीवावर एसीमध्ये बसतो, गाड्यातून फिरतो त्या स्थानिकांना सेवेत सामावून घ्यावे. वेतनवाढीचे प्रश्न सोडवावेत, कोणाचीही नोकरी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर त्यांच्या वेतनवाढीचाही निर्णय जेएसडब्ल्यू, फिनोलेक्स कंपनीने घ्यावा, अशी ही सूचना केली असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page