भाजपचे महाराष्ट्राचे सरचिटणीस नीलेश राणे आणि आमदार नीतेश राणे यांचा गैरसमज झाला आहे. त्यांचा गैरसमज काही दिवसांत दूर केला जाईल. आम्हाला महायुती म्हणूनच भविष्यातील निवडणुका लढवायच्या आहेत.
त्यामुळे कोणाच्याही वक्तव्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर परिणाम हाेणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली.
नीलेश राणे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांच्यावर निशाणा साधला हाेता. त्याबाबत मंत्री सामंत यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले की, पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच लढणार आहोत. माझ्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची मागणी भाजपने केलेली असली, तरी त्यावर मी काहीही बाेलणार नाही. या वादामध्ये मला पडायचे नाही.