शिरवळ येथे आयटी हब उभारणीसाठी निर्णय घेतला जाईल. यासाठी आरक्षण केले आहे. सातारा-पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत मंजूर आहे.
जिल्ह्यात एमआयडीसी विकसित करण्यात येत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत जिल्ह्यातील उद्योग आणि रोजगार निर्मिती संदर्भातील प्रश्न उपस्थित केला. येथील महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी बंद पडली आहे.
साताऱ्यामध्ये आता विकास व्हावा, अशी लोकांची आणि तरुणांची इच्छा आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्कूटर्सची जागा ताब्यात घेऊन तिथे नवीन प्रकल्प आणावा, असे शशिकांत शिंदे म्हणाले.
सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी बंद आहे. यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून ही जागा ताब्यात घेण्यासाठी एमआयडीसी प्रयत्न करेल, असे आश्वासन देखील सामंत यांनी दिले.
नेर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के उठवले नाहीत, असे आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून देताच, यासंदर्भात आदेश दिले असून त्याबाबतही लवकरच कार्यवाही होईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.
पुसेगाव, निढळ परिसरात २०१४ पासून एमआयडीसी मंजूर असून, पाणीसुद्धा आरक्षित झाले आहे. सर्वेक्षण होऊन दहा हजार एकर भूसंपादन झाले आहे. परंतु अजून पुढील कार्यवाही नाही.
सन २०१३-१४ मध्ये मी लोकप्रतिनिधी असताना औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला. खटाव तालुक्यातील दुष्काळी भागात औद्योगिक वसाहत निर्माण झाली, तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.