बीकेसी मैदानात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. मुंबई ही स्वायत्त आहेच, महाराष्ट्राची राजधानी आहे.
या मुंबईला तोडण्याची भाषा केली जात आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार जरी केला तरी देहाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग आता दिल्लीच्या नीती आयोगाकडून मुंबईची ब्ल्यु प्रिंट बनवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, तिकडे पंतप्रधान मोदी असूनही जर यांना सुरक्षित वाटत नसेल तर मोदींनी राजीनामा द्यावा आणि शिवसेनेत घेणार नाही पण शिवसेना काम कसे करते ते बघायला या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कटेंगे बटेंगेच्या घोषणेवर उद्धव ठाकरे यांनी भाजप महायुतीवर टीका केली.
मी मुख्यमंत्री असताना असल्या घोषणा नव्हत्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपले हिंदूत्व चूल पेटवणारे आणि त्यांचे हिंदूत्व हे घर पेटवणारे असल्याची देखील टीका उद्धव ठाकरेंनी केली. संपूर्ण मुंबई हे अदानीच्या घशात घालत आहेत. फक्त मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आसपासचा परिसर देखील अदानीला देण्याचा घाट घालण्यात आला आहे.
केवळ धारावी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र या अदानीच्या घशात घालण्याचा हा घाट घातला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. माझे सरकार आल्यावर अदानीला देण्यात आलेले सर्व प्रकल्प मी काढून घेणार आहे, असेही ते म्हणाले.
पंकजा मुंडेंना धन्यवाद ! उद्धव ठाकरे म्हणाले, पंकजा मुंडे यांना धन्यवाद द्यायचे आहेत. पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली. भाजपचे काम साधेसुधे नसते असे त्यांनी सांगितले. 90 हजार बुथवर 90 हजार माणसे असल्याची माहिती त्यांनी दिली होती. हे सर्व लोक बाहेरचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.