उद्धव ठाकरे : …तर तुमच्या साखरेला अमित शहांच्या मुंग्या लागणार

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे

 ”इथला हा पट्टा सहकार पट्टा आहे. इथे साखर कारखाने आहेत. आतापर्यंत सहकार हे खातं फक्त राज्यापुरतं मर्यादित होतं. पण हे जे वर दोन ठग बसले आहेत. त्यांनी वर्षभरात केंद्रात देखील एक सहकार खातं तयार केलंय व ते खातं अमित शहा घेऊन बसले आहेत. याचा अर्थ असा की मेहनत तुम्ही करणार.

कर्ज तुम्ही काढणार, कर्जबाजारी तुम्ही होणार आणि तुमच्या साखरेला अमित शहांच्या मुंग्यां लागणार. हळू हळू सगळं सहकार खातं ते ताब्यात घेतील. जर का उद्या असं झालं तर कारखाने आजारी पाडले, ते बंद प़डतील व मग त्यानंतर ते कारखाने फुकट्यात ताब्यात घेतले जातील. जशी मुंबई अदानीच्या घशात घातली जातेय अगदी तसंच होईल.

त्यामुळे महाराष्ट्राचं आयुष्य मोदी शहांच्या हातात जाणार असेल तर सर्वांनीच आपण आत्महत्या केलेल्या बऱ्या. यांना आता रोखलं नाही तर सहकार खातं गेलं म्हणून समजा”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची श्रीगोंद्यातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथे सभा पार पडली.

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी कशाप्रकारे राज्यातील सहकार खाते देखील अमित शहा यांनी स्वत:च्या ताब्यात घेतल्याचे सांगितले. तसेच जर आताच यांना रोखले नाही तर सहकार खातं पूर्णपणे आपल्या हातातून जाईल, असा इशारा देखील यावेळी दिला.

तसेच महाविकास आघाडीच्या सभेत येणाऱ्या महिलांना धमकी देणारे कोल्हापूरचे भाजप खासदार धनंजय महाडिक यांना देखील उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. ”जर इथे येणाऱ्या एकाही महिलेच्या केसाला धक्का जरी लागला तर तुझा हात जागेवर ठेवणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी धनंजय महाडिक यांना दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ”निवडणूक चार पाच दिवसावर आलेली आहे. मला असं वाटतं माझी बॅग ऑटो चेकींगवर टाकली आहे. आज तिसऱ्यांदा माझी बॅग तपासली. पण जसा माझी बॅग तपासल्याचा व्हिडीओ देशभर गेला. त्यानंतर ज्यांच्या भाषणाला प्रसिद्धी मिळत नाहीए ते देखील आता निवडणूक आयोगाकडून आपल्या बॅगा तपासून घेत आहेत.

माझ्या व्हिडीओ नंतर निवडणूक आयोगाला देखील एक नोटीस जारी करावी लागली. त्यात त्यांनी म्हटलं की पंतप्रधान सोडले तर इतर सर्वांच्या बॅगा तपासल्या जाणार. माझा बॅग तपासणीला विरोध नाहीच.

पण पंतप्रधानांची बॅग दखील तपासली गेली पाहिजे. ते देशाचे प्रधानमंत्री असले तरी ते एका पक्षाच्या प्रचाराला येत आहेत. जागोजागी फिरत आहे, रस्त्यांवर प्रचार रॅली घेत आहेत. ते देशाचे प्रधानमंत्री म्हणून प्रचार करत नाहीएत. त्यांच्याकडे कुठलं पद आहे. मी किमान एका पक्षाचा प्रमुख तरी आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Leave a Comment