उद्धव ठाकरे : “बहिणीवर अत्याचार होताना कंस मामा राख्या बांधत फिरतायत”

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे

बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने या बंदला परवानगी नाकारली तसेच “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी”, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

यानंतर महाविकास आघाडीकडून पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. तर आज महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून दादरच्या शिवसेना भवन परिसरात निषेध आंदोलन करण्यात आलं. त्यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील सेना भवन परिसरात तोंडाला काळा मास्क, तर दंडावर काळी फित बांधून निषेध व्यक्त केला. उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊतही उपस्थित होते. उद्धव ठाकरे काय म्हणाले? “अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

पण त्याही पेक्षा त्यांच्या पापावर पांघरूण घालणाऱ्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे. आज खरं तर महाराष्ट्र बंद कडकडीत झाला असता, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली. त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी आपले चेलेचपाटे कोर्टात पाठवले आणि अडथळे निर्माण केले. गेल्या आठवड्यात भारत बंद काही राज्यात पुकारला. त्यावेळी रेल्वे बंद झाल्या होत्या.

तेव्हा याचिकाकर्ते कुठे गेले होते. बंदला विरोध करणारे याचिकाकर्तेही तितकेच विकृत आहेत. इथे काही सरकारचे ‘सदा’आवडते आहेत. त्यांच्या माध्यमातून हा बंद होवू नये यासाठी कोर्टात गेले.

महिला जाब विचारत आहेत,  आमच्या सुरक्षेच्या आड का येताय? पण हे आंदोलन थांबता कामा नये. बस डेपो, रिक्षा स्टँड, चौकात स्वाक्षरी मोहीम घ्या. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत.

राखी बांधण्यात आडकाठी येऊ नये म्हणून आमच्या आंदोलनात आडकाठी करत आहात.इतकं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

तर दुसरीकडे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन केले. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे, बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर, तर यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथे निषेध आंदोलन केले. 

Leave a Comment