अहंकारी रावणाचा रामाने पराभव केला. त्यामुळे अहंकारी माणसांचेही या निवडणुकीत तेच होईल, असे सांगताना असली कोण, नकली कोण याचा निर्णय जनताच करेल.
तुमचे मांडलिकत्व स्वीकारलेले ‘असली’ असूच शकत नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
पालघर येथे भारती कामडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी आमदार विनोद निकोले, आमदार सुनील भुसारा यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
नकली शिवसेना असायला ही तुमची डिग्री आहे का? आता तुमचं नाही, आमचं नाणं वाजणार आणि 300 पार करून इंडिया आघाडी सत्तेत येणार, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पालघरला आम्हाला वाढवण बंदर नको, विमानतळ हवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे बोलतात ते बाळासाहेबांचे विचार नाहीत.
दिल्लीचा फोन आला की मिधेंची दाढी चळाचळा कापते. बाळासाहेबांच्या फोनमुळे नेत्यांची चळाचळा कापायची, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरदेखील टीका केली. एकनाथ शिंदे यांना संपवले आहे. यांना माहितीदेखील नाही यांच्या बुडाखालची सतरंजी काढून घेतली.
अजून पालघरची उमेदवारी जाहीर केली नाही. त्यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदी, तुम्ही विश्वगुरू आहात; पण तुम्ही प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय भाषण पूर्ण का होत नाही. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी चीनला उत्तर द्यायला पाहिजे. तिकडे काहीच बोलत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.