उद्धव ठाकरे : निवडणुकीत जनता गद्दारांना गाडेल…

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे

ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, अशा गद्दारांना कोकणी जनतेने यापूर्वीच गाडले आहे. हाच कोकणी जनतेचा संदेश घेऊन आपण ‘बांदा ते चांदा’ असा महाराष्ट्रभर प्रवास सुरू केला आहे. कोकणातील जनतेने हुकूमशाही, गुंडशाही गाडली आहे.

हाच कोकणी जनतेचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रातील जनता घेईल आणि येत्या निवडणुकीत येथील जनता गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुडाळ येथील जनसंवाद मेळाव्यात व्यक्त केला.

कोकण दौर्‍यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा झाली. यावेळी शिवसेनेच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

व्यासपीठावर सौ. रश्मी ठाकरे, खा. विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, आ. वैभव नाईक आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले, देशात भाजप आणि संघ परिवाराकडून एक प्रकारची हुकूमशाही सुरू आहे. या हुकूमशाहीविरोधात आपला लढा आहे.

सरकारमध्ये मिंदे गँग, भाजप गँग असून आतापर्यंत कधी घडली नव्हती अशी गोळीबाराची घटना पोलिस ठाण्यात घडली. सरकारमध्ये सामील असलेल्या आमदाराला पोलिस ठाण्याच्या आवारात गोळीबार करावा लागतो, हेच तुमचे हिंदुत्व आहे का? असे पंतप्रधान आणि संघ परिवाराला विचारण्याची वेळ आली आहे.

जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणणार्‍या भाजपच्या आमदाराने गोळीबार केला. मग अशा लोकांच्या हाती यापुढे सत्ता दिली तर काय होईल, असा सवाल ठाकरे यांनी केला. खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांची भाषणे झाली.

Leave a Comment

You cannot copy content of this page