पक्षाने सर्वकाही देऊनही खासदार हेमंत गोडसे यांनी पक्षाशी गद्दारी केल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा जिंका. गद्दारांना धूळ चारा, असे आदेश शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचे आहे. हे करत असताना काही जागांवर पक्षाला तडजोड करावी लागेल, त्याची तयारी ठेवा, अशा सूचनाही त्यांनी नाशिक आणि दिंडोरीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. गुरूवारी (दि.१७) ठाकरे यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
या बैठकीला संपर्कनेते संजय राऊत, उपनेते सुनिल बागूल, अद्वय हिरे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी गटनेते विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, जयंत दिंडे, गणेश धात्रक यांच्यासह तालुकानिहाय संपर्क प्रमुख उपस्थित होते.
नाशिक लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बूथ प्रमुख त्यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून संघटनात्मक ताकद वाढवा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. काही जागांवर पक्षाला तडजोड करावी लागेल, त्याची तयारी ठेवा, असे सूचक विधान ठाकरे यांनी या बैठकीत केले.
या लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असो आपल्याला एकत्र मिळून ही निवडणूक लढायची आहे आणि त्या उमेदवाराला साथ द्यायची आहे, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.