उद्धव ठाकरे : ४ तारखेला जनता डीमोदीनेशन करेल…

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे

आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीमॉनिटायझेशन करून चलनातील नोटांची धूळधाण केली. त्याचप्रमाणे ४ जूनला या देशात डी मोदीटायझेशन होणार असा घणाघात डोंबिवलीतून सभेतून उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच पंतप्रधान म्हणून मोदींची महाराष्ट्रातील ही शेवटच्या सभा असल्याची बोचरी टीकाही केली.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीच्या भाग मैदान येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. आजच्या सभेवरही पावसाचे सावट निर्माण झाले होते; पण सभा ठाकरे यांनी भर पावसातच सभा घेतली.

विशेष म्हणजे, पावसाच्या सरी बरसल्यानंतरही शिवसैनिकांनी जागा सोडली नाही. हा धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याचा कांगावा भाजप करत असल्याचे सांगितले. तसेच ज्या भाजपबरोबर २५ वर्षे काढली तेव्हा भाजपमध्ये नाही गेलो तर आता काय विलिनीकरण करणार, असा सवाल उपस्थित केला.

यावेळी हिंदुत्व सोडले अशी ओरड करायची आणि कर्नाटकमध्ये जाहीरपणे अल्पसंख्याकांची री ओढणारे चंद्राबाबू नायडू चालतात का, असा सवाल करत महागाईवर बोलण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment