उद्या कोरेगावात अजित पवारांची सभा

Photo of author

By Sandhya

उद्या कोरेगावात अजित पवारांची सभा

कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रणित महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार विकास पॅनेलने नेत्रदीपक यश मिळवत विरोधी महायुतीच्या कोरेगाव विकास आघाडीचा दारुण पराभव केला.

या विजयानिमित्त सोमवारी (दि.8) सकाळी 10.30 वाजता कोरेगाव रेल्वे स्टेशन नजिक जितराज मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भात माहिती देताना कोरेगाव तालुका विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अरुण माने, तालुकाध्यक्ष भास्कर कदम व कार्याध्यक्ष श्रीमंतदादा झांजुर्णे सांगितले की, कोरेगाव बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह राष्ट्रीय कॉंग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अत्यंत चांगल्या पद्धतीने यश मिळवले आहे.

विरोधकांनी केलेले विजयाचे दावे फोल ठरवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पर्यायाने महाविकास आघाडीचा झेंडा बाजार समितीवर डौलाने फडकवला आहे. कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीमुळे आनंदाचे वातावरण आहे. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आनंद सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले जाणार आहे.

यावेळी माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बाळासाहेब पाटील, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात अजित पवार हे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील तर आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील हेही मार्गदर्शन करणार आहेत. कोरेगाव तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या विजयी सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Comment