उल्हासनगर गोळीबार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांकडून उच्च चौकशीचे आदेश, SIT देखील स्थापन

Photo of author

By Sandhya

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांकडून उच्च चौकशीचे आदेश, SIT देखील स्थापन

जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणादरम्यान हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणी आणि संदीप सर्वणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

यानंतर उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

तसेच या घटनेच्या तपासासाठी एसीपी नीलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. असे वृत्त एएनआयने दिले आहे.

द्वारली गावात एका भूखंडावर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी महेश गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की केली होती.

याची तक्रार देण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी गणपत गायकवाड यांच्या मागे महेश गायकवाड यांचे समर्थकही पोहचले.

हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर दोन्ही गट बसलेले असताना हा गोळीबार झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

गणपत गायगवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात राहुल पाटील यांनाही एक गोळी लागली. यादरम्यान हर्षल केणी यांनीही रिव्हॉल्वर बाहेर काढली होती, ती वरिष्ट पोलिस निरीक्षक जगताप यांनी लॉक केली. यावेळी झालेल्या झटापटीत जगताप देखील जखमी झाले. जखमींना उल्हासनगरच्या मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment