दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरलेल्या पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न विचारला. त्याला लागलीच उत्तर देत याबाबत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्र्यानी आज लोकसभेत दिले.
लोकसभेत आज झालेल्या प्रश्नोत्तराच्या चर्चेदरम्यान खासदार सुळे यांनी हा प्रश्न विचारला. खुद्द महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. इतकेच नाही, तर सत्ताधारी असलेल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा तब्बल ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचा अपहार झाल्याची कबुली खुद्द सरकारनेच दिली आहे.
राज्य शासनाच्या या कबुलीबाबत केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते का? आणि या घोटाळ्याचे चाैकशीचे आदेश आपण देणार का? असा प्रश्न सुळे उपस्थित केला. यावर लागलीच उत्तर देत कृषीमंत्र्यांनी या प्रकरणाची चाैकशी करुन कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करु, असे आश्वासन दिले