समाजात सटरफटर गप्पा मारणार्यांची कमी नाही. उगाच एकत्र येत अनेक विषयांवर गप्पा मारल्या जातात. त्या कुठच्या कुठे पोहोचतात. दादाने असा का निर्णय घेतला असेल अशाही चर्चा होतात.
पण मी गेली 32 वर्षे राजकारणात आहे. मी घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यात जास्त हित बारामतीकरांचे झाले आहे, अन्यथा पाण्याचे काय झाले असते याची कल्पना न केलेली बरी या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होण्याबद्दल स्पष्टीकरण दिले.
कोर्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील श्रीराम ऊसलागवड पॅटर्नला त्यांनी भेट दिली. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, बारामतीचे पाणी दुसरीकडेच चालले होते.
पण मी घेतलेल्या निर्णयामुळे हित झाले. येथील भगत कुटुंबीयांच्या श्रीराम ऊस लागवड पॅटर्नचे पवार यांनी कौतुक केले. सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष स्व. रामचंद्र भगत यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. तीन, साडेतीन दशके रामचंद्र भगत हे सोमेश्वरवर संचालक होते.
1991 ला मी बँकेला उभा राहिलो असताना पश्चिम भागात ज्यांनी मला साथ दिली, त्यात भगत अग्रस्थानी होते. त्यांची व माझी विचारसरणी भिन्न होती. परंतु त्या वेळी त्यांनी मला दोन मतांचे सहकार्य केले. त्यानंतर त्यांची व माझी गट्टी जमली. ती जिवात जीव असेपर्यंत टिकली, असे पवार म्हणाले.
आधुनिक शेती करणारे कुटुंब म्हणून भगत कुटुंबाकडे बघितले जाते. त्यांनी यंदा सोमेश्वरला 5 हजार टन ऊस दिला. आमदार दत्तात्रय भरणे हे 10 हजार टन ऊस कारखान्याला घालतात.
सगळ्यांनाच चांगली शेती करणे जमत नाही. मी राजकारणात आलो नसतो, तर चांगली शेती केली असती, असे ते म्हणाले. बारामती बाजार समितीत सर्वात जास्त भुसार माल भगत कुटुंबीयांकडून दिला जातो. ते फक्त राजकारण, समाजकारण करत नाहीत, तर उत्तम शेती करतात, असे पवार म्हणाले. सोमेश्वरचे संचालक सुनील भगत, प्रगतशील शेतकरी विलास भगत यांनी ऊस शेतीविषयी पवार यांना माहिती दिली.