उपमुख्यमंत्री अजित पवार : इतरांना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण…

Photo of author

By Sandhya

इतरांना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण

राज्यातील इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळ उपसमिती धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कार्यरत आहे. एखाद्या घटकाला आरक्षणाचा घास देताना दुसर्‍याच्या तोंडातील घास कमी होता कामा नये, याची काळजी सरकार घेत आहे.

त्यामुळे मराठ्यांना स्वतंत्र, टिकणारे आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे, अशी भूमिकाही पवार यांनी मांडली.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 62 व्या गाळप हंगामाची सुरुवात पवार यांच्या हस्ते मोळी टाकून दसर्‍याच्या मुहूर्तावर करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. या वेळी आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, सतीश काकडे, शहाजी काकडे, विश्वासराव देवकाते, सतीश काकडे आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले की, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे आहे. परंतु, ओबीसींचा त्याला मोठा विरोध आहे. धनगरांना एसटीचे आरक्षण पाहिजे. परंतु, आदिवासी समाजाचा त्याला प्रचंड विरोध आहे, त्यामुळे हा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी वरिष्ठपातळीवर मोठे काम सुरू आहे.

न्यायालयाने मराठ्यांचे आरक्षण कोणत्या मुद्द्यांवर नाकारले, याचाही विधिज्ञ अभ्यास करीत आहेत. अभ्यासाअंती निर्णय घेतला जाईल. केंद्रीय प्रदूषण महामंडळाने राज्यातील पंचेचाळीस साखर कारखान्यांना प्रदूषण होत असल्याने बंद करण्यास सांगितले आहे, त्यामुळे सोमेश्वर कारखान्याने निरा नदी, कालवा तसेच परिसरात प्रदूषण होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी.

असे आवाहनही पवार यांनी केले. वारंवार होणार्‍या खंडित वीजपुरवठ्याकडे शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे अजित पवार यांचे लक्ष वेधले असता पवार यांनी 55 हजार कोटी थकबाकी असल्याचे सांगितले, तसेच सोलर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे सांगितले.

प्रास्ताविक अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी स्वागत केले. उपाध्यक्षा प्रणीता खोमणे यांनी आभार मानले. आत्महत्या करू नका आरक्षणावरून कोणीही आपला जीव गमावू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

एवढ्या सुंदर जगात आपण जन्माला आलो आहोत, ते जीव द्यायला नाही. अनेक प्रसंग येतात; मात्र स्वतःचा जीव देणे हा त्यातला मार्ग नाही. तुम्ही वाघासारखे जीवन जगले पाहिजे, असा सल्ला पवारांनी युवकांना दिला.

संचालकांची साखर बंद करा सोमेश्वर कारखान्याने या वर्षी सभासदांना दिवाळीसाठी दहा किलो साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सभेत शेतकर्‍यांनी पवार यांना निवेदन देत तीस किलो साखर देण्याची मागणी केली.

मात्र, तीस किलोची मागणी योग्य नसल्याची माहिती पवार देत असतानाच शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी व्यासपीठावरच कारखान्याचे संचालक दर महिन्याला शंभर किलो साखर घेत असल्याची माहिती देत ती बंद व्हावी, अशी मागणी केली. यावर सभागृहात जोरदार टाळ्या पडल्या. पवार यांनी याबाबत माहिती घेतो, असे सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page