राज्यात पोलिसांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिस दलाला मोठ्या तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यात १७ हजार पोलिसांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२७) दिली.
राज्याचा वर्ष २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री पवार यांनी विधान सभेत सादर केला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
राज्यातील पर्यटक आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर, जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना दिली.
राज्यात नवीन सुक्ष्म व लघू उद्योग धोरण लागू केले जाणार आहे. दाओसमधील करारानुसार ३ लाख रुपयांची गुंतवणूक झाली असून २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या मौजे वडज इथे शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. यात वस्तुसंग्रहालय, शिवकालीन गाव, किल्ल्यांची प्रतिकृतींचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.