Uruli Kanchan – Clashes erupt between two groups in Gurhali; Firing, attack by a coyote, two bikes burnt

उरुळी कांचन प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शुक्रवार, (ता. 16) रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील वाघापूर चौफुला परिसरात, सासवड रोडलगतच्या मोकळ्या शेतात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान कोयत्याने वार करत एकावर जीवघेणा हल्ला, तसेच हवेत फायरिंग आणि दोन मोटारसायकली पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील दोन गट हे उरुळी कांचन व गुरु्हुळी परिसरातील असल्याची जोरदार चर्चा सुरू असून, यामुळे हवेली व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर काही वेळातच परिसरात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली होती.
हाणामारीदरम्यान एका व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे. फायरिंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले, तर जाळपोळीमुळे घटनास्थळी धुराचे लोट पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची सखोल पाहणी करत जाळलेल्या मोटारसायकली तसेच इतर महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेमागे जुना वाद, वर्चस्वाची लढाई की इतर कोणते कारण आहे, याचा तपास पोलीस करत असून, काही संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले,
“घटनेचा तपास वेगाने सुरू आहे. कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
दरम्यान, भर चौका जवळ घडलेल्या या फायरिंग व जाळपोळीच्या घटनेमुळे पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.