नात्यातील तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
21 वर्षीय आरोपी तरुणाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी तरुणाने 14 वर्षीय पीडित मुलीला दंडात इंजेक्शन दिले.
यानंतर मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिच्या नकळत तिचे फोटो काढले. भेटायला बोलावले तेव्हा न गेल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
…अशी फुटली घटनेला वाचा पीडित मुलगी एका शाळेत शिकते. याबाबत घरच्यांना सांगितल्यावर ते चिडतील आणि वाद होतील, यामुळे पीडित मुलीने कोणालाही सांगितले नव्हते. बदलापूरच्या घटनेनंतर प्रत्येक शाळेत तक्रारपेटी लावण्यात आली आहे.
पीडित मुलीने तक्रारपेटीत तिच्या सोबत झालेल्या प्रकार लिहून तक्रारपेटीत टाकला होता. त्याची दखल घेत शाळेच्या प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली.