आजपासून राज्यातील विधिमंडळाचे 27 सदस्यांचे शिष्टमंडळ हे सरकारी पैशांतून जपानच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या शिष्टमंडळामध्ये सर्वपक्षीय आमदारांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना पक्षाच्या आमदारांचा समावेश करण्यात आलेला आहे. 11 एप्रिल ते 21 एप्रिल असे 10 दिवस हा अभ्यास दौरा असणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जपानला रवाना होणार आहे.
त्यात माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, श्वेता महाले, राजहंस सिंह, रमेश पाटील, ज्ञानराज चौगुले, किशोर पाटील, मनिषा कायंदे, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, चेतन तुपे, विक्रम काळे, लहू कानडे, संजय जगताप, बळवंत वानखेडे, जयंत आसगांवकर आणि क्षितीज ठाकूर या विधानसभा तसेच विधान परिषद सदस्यांचा समावेश आहे. तसेच, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दौऱ्यावर कॉंग्रेसचे सर्वाधिक आमदार जाणार असल्याची माहिती आहेत. दरम्यान, आता या अभ्यास दौऱ्याच्यामध्ये हे शिष्टमंडळ बुलेट ट्रेनमधून देखील प्रवास करणार आहेत.
दोन्ही गट “शिवसेना’ नावाखाली या दौऱ्यासंदर्भातील एक यादी विधिमंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये निलम गोरे, मनिषा कायंदे, किशोर पाटील, ज्ञानराज चौगुले या चारही आमदारांचा उल्लेख शिवसेना असाच करण्यात आला आहे. वास्तविक यातील दोन आमदार उद्धव ठाकरे यांच्या तर अन्य दोन आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आहेत. ज्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षाचे आमदार वेगवेगळ्या नाही तर एकाच पक्षाचे सदस्य म्हणून या दौऱ्यावर जाणार आहेत.