गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून किमान २० जणांचा मृत्यू झाला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नैसर्गित आपत्तीत झालेल्या जीवितहानीच्या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तसेच जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.
“गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. या आपत्तीत ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.
स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य केले जात आहे. तसेच जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे,” असे अमित शहा यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, दाहोद जिल्ह्यात ४, भरुच ३, तापी २ आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाद, खेडा, मेहसाणा, पंचमहल, साबरकांठा, सूरत, सुरेंद्रनगर आणि देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.