राज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य खोके सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. लोकसभेत फटका बसला, म्हणून लाडकी बहीण योजना आणली, पण आता याच योजनेवरून हे भाजपवाले महिला भगिनींना धमकावत आहे.
भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दीड हजार रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवा, फोटो काढा, असे सांगितले. महायुती सरकार आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत नाही. मी तुमच्या सुख-दुःखाचा सदैव साथी आहे. सख्खा जरी नसलो, तरी पक्का भाऊ आहे, असे मत विरोधी पक्षनेते, तथा ब्रह्मपुरीचे विजय वडेट्टीवार यांनी केले.
कार्यक्रमाला अॅड. राम मेश्राम, संदीप गड्डमवार, दिनेश चिटनुरवार, रोहित बोम्मावार, नितीन गोहने, राजेश सिद्धम, विजय मुत्यालवार, गोपाल रायपुरे, विजय कोरेवार, निखिल सुरमवार, उषा भोयर, पुरुषोत्तम चौधरी, किशोर कारडे, संदीप पुण्यापवार, तथा ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी व अन्य मान्यवर मंचावर होते.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, देशातील व राज्यातील हे महापापी सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करते, पण शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावत आहे. मोदी सरकार आले, तेव्हा तर पंधरा लाख देऊ, असे आश्वासन दिले. आता १,५०० रुपये दिले आणि गाजावाजा करत आहेत.
ब्रह्मपुरी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाच हजार कोटींचे काम आघाडी सरकार असताना सुरू केले. या प्रकल्पाला निधी मिळावा, म्हणून झगडावे लागले, पण यामुळे संपूर्ण क्षेत्रातील ८० टक्के शेती ओलिताखाली आली आहे, तसेच मतदारसंघातील रस्ते, घरकूल योजना, शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहे, वाचनालय,
गावागावात सामाजिक सभागृहे, शुद्ध पेयजल योजना, क्रीडांगणाचा विकास, आरोग्य व प्रशासकीय सेवेसाठी प्रशस्त इमारती, यासाठी आमदार म्हणून आपल्या कामाचा लेखाजोखा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला. ब्रह्मपुरीमध्ये मी लोकप्रतिनिधी नाही, तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.