आपला हक्क मांडत असताना दोन समाजात तेढ निर्माण होईल, याला माझा पाठिंबा नाही. दोन गट पडतील, तर आमचा विरोध आहे, असे स्पष्ट करत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या काही विशिष्ट भूमिकेला आमचे समर्थन नाही.
मात्र, त्यांच्यावर दबाव आहे का? हे भुजबळ यांनाच विचारा, असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आजकाल सगळे दाखले देऊन झालेत, साप निघून गेला, आता काठी मारून काही फायदा नाही. भूमिका मांडताना सर्वोच्च टोकाची असू शकत नाही.
समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत. गावागावात भांडण झाली तर त्याला कोण जबाबदार राहणार? सत्तेत असलेल्या माणसाने समस्या सोडवायच्या असतात, मांडायच्या नसतात. आता सत्तेतील नेते समस्या मांडतात, तर मग सत्तेत का राहता?
ओबीसींचे नेते म्हणालेत, आमचे सेनापती खरगे आहेत. माझी भूमिका मी अगोदर मांडली. शरद पवार यांच्या भेटीमुळे नाही. लवकरच उघडे पडेल, सारे कोण करतेय हे दिसेल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
बुद्धांच्या मार्गावर चाललो, तर देश शांतीच्या मार्गाने चालला असता असे मी बोललो. बोलण्याचा अर्थ चुकीचा नव्हता, त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. मंदिरात दान पेटी नको, या संदर्भात वक्तव्यावर मी ठाम आहे. दान पेटी नसताना मंदिरात फक्त देव असतील पंडित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वडेट्टीवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर या राज्याचे भवितव्य अवलंबून आहे. आजच्या परिस्थितीनुसार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायद्याने, संविधानाने या सगळ्या परिस्थितीमध्ये जो निकाल येणार, तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने लागेल, असे मला वाटते.
मंत्रिमंडळ विस्तार शक्यताबाबत नवीन पंडित आता सत्तेमध्ये आहेत. ते भविष्य वर्तवतात पंडितांचा आणि ज्योतिषांचा भरणा जास्त झाला आहे. मुहूर्त काढत जा आणि टाळत जा, अशी परिस्थिती आहे.
भरत गोगावले आता नवीन पंडित झाले असावेत, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. दरम्यान, शिंदे गटातील आमदार आशिष जैस्वाल यांच्याकडे मोठं पद आहे. रेती आणि कोळशाचे काम त्यांच्याकडेच आहे. आता कशाला त्यांना दुसरे पद पाहिजे? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.