चंद्रपूर येथील एक शाळा अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी या निर्णयावरून महायुतीवर हल्लाबोल केला आहे.
विमानतळ, वीज, धारावी आणि आता शाळेवरही अदानींचा डोळा आहे. महायुती सरकार महाराष्ट्राचा सातबारा अदानीच्या नावे लिहिणार का, असा प्रश्न विधासभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने, चंद्रपूर येथील कार्मेल एज्युकेशन सोसायटीची माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून विरोधाचे सूर उमटू लागले आहेत.
वडेट्टीवार यांनी समाज माध्यमात व्हिडीओ जारी करत सरकारवर टीका केली आहे. शाळेच्या भिंतीवर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी,
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा लावल्या जातात. आता त्यांच्यासोबत गौतम अदानी यांचाही फोटो लावायची तयारी महायुती सरकारकडून सुरू झाली आहे, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.