मालवणमधील शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेविरोधात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत असतानात विरोधी पक्षांनी राज्य आणि केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या दुर्घटनेवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथील शिवपुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेवरून आता राजकारणही पेटलं आहे.
एकीकडे या घटनेविरोधात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत असतानात विरोधी पक्षांनी राज्य आणि केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या दुर्घटनेवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील आपल्या अकाऊंटवरून या दुर्घटनेबाबत संताप व्यक्त करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून २४ तास होत आले, पण राज्य सरकारने चौकशी नेमली का?
नौदल आणि राज्य सरकारने एकमेकांकडे बोट दाखवू नये, महाराष्ट्राचा जनतेला कळले पाहिजे की हे कंत्राट ठाण्यातील कंत्राटदाराला का दिले? कंत्राट देण्यासाठी काय प्रक्रिया राबवली? या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत.
दरम्यान, ठाकरे गटानेही या दुर्घटनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हे बेईमान, गद्दार सरकार आहे त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला तो कोसळला. चांगल्या मनाने हे बनवलं नाही. राजकीय हेतूने बनवला. छत्रपती शिवाजी महाराजांनाही या लोकांनी सोडलं नाही. पुतळ्याच्या बांधकामातही लाखो-कोट्यवधीचा घोटाळा केला.
महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा. जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, रवींद्र चव्हाण त्यांना बडतर्फ करायला हवं अशी मागणी करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला
तर या प्रकरणी या दुर्घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे. हा पुतळा उभारण्याचं कंत्रात मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं.
जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक, तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.