सांगली जिल्ह्यात सत्तेमुळे अहंकार निर्माण झालेला एक नेता निर्माण झाला होता. जनतेने सत्ता काढून घेतल्यानंतर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. काहीतरी करून पुन्हा सत्ता काबीज करायची या भावनेने ते आता आमदारकी लढत आहेत. येथील पराभवानंतर कदाचित तासगावची नगरपरिषद देखील लढतील.
मात्र आता या विरोधकांना डोके वर काढू देणार नाही, असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिला. ते तासगाव येथे रोहित आर. आर. पाटील यांचा विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते.
ते म्हणाले, सोळा वर्षे आमदार, दोन वेळा खासदारपदी सत्तेत राहून सुद्धा ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. दुसर्याने केलेल्या कामावर स्वतःला नाव जोडायची वेळ येते.
त्यामुळे संजय पाटील सत्तेसाठी विधानसभा लढत आहेत. त्यांचा रोहित पाटील यांच्याविरोधात खूप मोठ्या फरकाने पराभव होणार आहे. सत्तेच्या लालसेपोटी ते जनतेच्या मनातून उतरले आहेत, तरीदेखील त्यांना अजून हाव आहे.
ते इतके दिवस सांगत होते की प्रभाकर पाटील आमदार होणार. जो नेता सत्तेसाठी मुलाला बाजूला करून स्वतः लढतो तो जनतेसाठी काय करणार, असा सवाल त्यांनी केला. स्वतःच्या पोरासाठी ते थांबू शकत नाहीत, हे जनता आता जाणून आहे. रोहित पाटील हे आमच्यासाठी राबले आहेत. आता आमच्यावर पैरा फेडण्याची वेळ आली आहे.
आमचं दादा घर रोहित पाटलांसाठी राबणार. पुढे ते म्हणाले, कोणत्या अडचणीमुळे अजितराव घोरपडे यांनी संजय पाटील यांना पाठिंबा दिला हे माहीत नाही. पण मी अजितराव घोरपडे यांना विनंती करणार आहे, की ज्या भुताला गाडण्यासाठी आपण एकत्र आलो, त्या भुताला पुन्हा डोकं वर आणू देऊ नका.