धायरी : मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका कारला पाठीमागून जोराची धडक दिली.
सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच ठिकाणी ११.३० च्या सुमारास दुसरा अपघात झाला आहे.
नवले पुल परिसरात गेल्या काही वर्षांपासून सतत अपघात घडत आहेत. प्रशासनाकडून हा परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला आहे. तसेच अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात येथे उपाययोजनाही करण्यात आल्या. तरीही या परिसरातील अपघाताचे सत्र मात्र काही केल्या थांबायला तयार नाही. महामार्गावर हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या.
सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे व वाहतूक कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली आहे. या परिसरात सातत्याने अपघात घडत असून बुधवारी देखील कंटेनर व ट्रकचा अपघात या परिसरात झाला होता. यात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला होता.
अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस चौकीचे आज उद्घाटन
नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या वतीने नवीन कात्रज बोगद्याजवळ पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या नव्या वाहतूक पोलीस चौकीचे आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.