
वर्धा : वर्ध्यातील सेलू इथे भीषण अपघात झाला आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मित्रासोबत नागपूरवरुन पार्टी करून परत येत असताना भरधाव कारचा अपघात झाला. कार अनियंत्रित होउन पलटी झाली. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी, १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १.१० वाजण्याच्या सुमारास घडली. नागपूर – तुळजापूर मार्गावरील सेलूच्या बोर नदीच्या पुलाजवळ हा अपघात घडला.
मृतांमध्ये समीर परसराम चुटे – वय २८, शुभम कवडू मेश्राम – वय २८, सुशील अरुण मस्के – वय २९ या तरुणांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी कारचालक धनराज भीमराव धाबर्डे, वय ४० हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व मित्र वर्धा नजीकच्या सिंदी (मेघे) येथील रहिवासी आहेत.
यातील गंभीर जखमी धनराज धाबर्डे यांचा गुरुवारी वाढदिवस होता. या आनंदापोटी वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी सर्व मित्र नागपूर येथे कार क्रमांक एम एच १४ जी एस ९२१५ ने सिंदी (मेघे) वरून कारने नागपूरला गेले. तिथे वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर कारने परत येत असताना सेलूजवळ भरधाव कार पलटी झाली.
या अपघातात शुभम मेश्राम आणि सुशील मस्के जागीच ठार झाले तर, समीर चुटे आणि कारचालक धनराज धाबर्डे गंभीर जखमी झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच रुग्ण मित्र प्रज्वल लटारे यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमींना दोघांना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर सेवाग्रामच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. पोलीसही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. या अपघातातील जखमी दोघांनाही सेवाग्रामवरून नागपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आलं. तर जखमी धनराज धाबर्डेवर नागपूर येथे उपचार सुरू आहे.
वाढदिवसाची पार्टी काळ ठरली
या अपघातातील गंभीर जखमी धनराज याचा वाढदिवस असल्याने सर्व मित्रांनी आनंदात तो साजरा करण्याचं ठरवलं. त्यासाठी नागपूर येथे पार्टीचं नियोजन झालं. वाढदिवसही आनंदात साजरा झाला, मात्र परत येताना मृत्यू आपली वाट पाहत आहे याची चाहूल कुणालाच नव्हती. आनंदानंतर काहीच वेळा तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच सिंदी (मेघे) गावात शोककळा पसरली आहे. तरुणांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सेलू पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.