वारजे परिसरात मुठा नदीपात्रात राडारोड्याचे ढीग

Photo of author

By Sandhya

वारजे परिसरात मुठा नदीपात्रात

वारजे परिसरात मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे नदीचे पात्र अरुंद होत असल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

तसेच, कचर्‍यामुळे जलप्रदूषणातदेखील वाढ झाली आहे. यामुळे नदीपात्रात राडारोडा व कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नदीतून सध्या पाण्याचा प्रवाह वाहत नसल्याने उत्तमनगरपासून पुढील पात्रात जलप्रदूषण वाढले आहे. वारजेपर्यंत नदीच्या दोन्ही तीरांवर अनेक ठिकाणी बांधकामांचा राडारोडा टाकला जात आहे.

काही वर्षांपूर्वी खळखळत वाहणार्‍या या नदीत तीरांवर राडारोडा, मातीचे ढीग व कचरा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच, कंपन्यांचे रसायन मिश्रित पाणी व सांडपाणीदेखील थेट नदीत सोडले जात असल्याने जलप्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे.

वारजे परिसरातील स्मशानभूमी येथून दांगट इंडस्ट्रियल इस्टेट, तसेच शिवणे, उत्तमनगरपर्यंत नदीपात्रालगत राडारोडा टाकून सपाटीकरण करण्यात आले असून, या ठिकाणी काही व्यावसायिकांची अतिक्रमणे केली आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

Leave a Comment