वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीमार दुर्दैवी ; अजित पवार

Photo of author

By Sandhya

अजित पवार

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीमार दुर्दैवी आहे. या सोहळ्यात अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून, सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी.

या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सातारा येथे रविवारी केली. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित कैलास स्मशानभूमी येथे गॅस दाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याला वेगळी परंपरा आहे. राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक, वारकरी या ठिकाणी येत असतात. हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होत असतो. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचा पालकमंत्री असताना या सोहळ्यासंदर्भात सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांमध्ये आम्ही बैठका घेत होतो.

वारकरी नेहमीच शिस्तबद्ध आचरण करतात. मात्र, या सोहळ्यात आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी रविवारी जोरदार लाठीमार केला. ही घटना ऐकून मन सुन्न झाले आहे.

वारकऱ्यांचा पाठलाग करुन, त्यांच्यावर लाठीमार झाला आहे. ही बाब महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारी आहे. राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून मी या घटनेचा निषेध करतो. सरकारने या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आ. अजित पवार यांनी केली.

Leave a Comment