इंद्रायणी नदीत जलपर्णी व रासायनिक तवंग: आरोग्यासाठी गंभीर धोका

Photo of author

By Sandhya


इंद्रायणी नदी पात्रात तीर्थक्षेत्र देहु ते आळंदी पर्यंत चिखली, मोई, मोशी, कुरुळी व चिंबळी परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली असून पाण्यावर रासायनिक तवंग आला आहे. या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेक जातीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

      पिंपरी – चिंचवड व चाकण एमआयडीसीतील कंपन्या मधील रासायनिक पाणी व सांडपाणी थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे देहू ते आळंदी दरम्यान नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. पूर्वी इंद्रायणी नदीवरून आजूबाजूंच्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या. परंतु आता नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने स्थानिकांना पाण्यासाठी बोअर व विहिरीचे पाणी वापरावे लागत आहे. काही गावांना तर पाणी विकत घ्यावे लागत आहे. रब्बी हंगामात नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कांदा, ऊस, ज्वारी, बटाटा, गहू, मका, पालेभाज्या आदि पिकांचे प्राधान्याने उत्पन्न घेतले आहे. या पिकांना नदीचे दूषित पाणी देताना त्यांच्या हाता पायाला खाज येत आहे. तसेच डास चावल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. 
    ” इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात. मात्र, तोकड्या यंत्रणेने इंद्रायणीच्या जलपर्णीची समस्या अनेक वर्षापासून कायम आहे. इंद्रायणी नदीवरील पुलावरून ठीकठिकाणी नागरिक कचरा, प्लास्टिक, राडारोडा नदीपात्रात टाकतात. त्यामुळेही नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होऊ लागली आहे.”

” इंद्रायणी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढत असून पाण्यावर रासायनिक तवंग आला आहे. या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेक साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनीच आता इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी तातडीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.” – आशिषभाऊ येळवंडे, यांनी सांगीतले

Leave a Comment

You cannot copy content of this page