
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांचा स्वत:चा 3100 पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे. या पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर आला आहे. जनतेचा जो काही निर्णय आहे तो आम्ही विनम्रतेने स्वीकारत आहोत. जनतेचा निर्णय हा शिरसावंद्य आहे. मी भाजपला या विजयासाठी खूप शुभेच्छा देतो. ज्या आशेने लोकांनी भाजपला मतदान केलं आहे, त्या सर्व आशा भाजपकडून पूर्ण केल्या जातील, अशी इच्छा व्यक्त करतो”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
“आम्हाला जनतेने गेल्या 10 वर्षात जी संधी दिली या काळात आम्ही बरीच चांगली कामे केली. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज अशा विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचं काम केलं. तसेच विविध माध्यमातून जनतेला दिलासा देण्यासाठी कामे केली. दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला सुधारण्याचा प्रयत्न आम्ही केला”, असं मत अरविंद केजरीवाल यांनी मांडलं.
‘आम्ही राजकारणाला फक्त एक माध्यम मानतो’
“आता जनतेने निकाल दिला आहे, आम्ही फक्त सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर आम्ही समाजसेवा, जनतेच्या सुख, दु:खात मदत करणं, ज्यांना मदती हवी असेल त्यांच्या मदतीला आम्ही जावू. आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलो नाहीत. आम्ही राजकारणाला फक्त एक माध्यम मानतो, ज्याद्वारे जनतेची सेवा केली जाऊ शकते. आम्ही ते काम करत राहू”, असं केजरीवाल म्हणाले.
“मी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ते खूप चांगल्याप्रकारे निवडणूक लढले. त्यांनी खूप मेहनत केली, खूप सोसलं. त्यामुळे त्यांचे देखील अभिनंदन करतो”, असंदेखील अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.