मतदानाचा अधिकार वापरून राज्यात परीवर्तन करू :- खासदार शरद पवार

Photo of author

By Sandhya

एकीकडे लाडकी बहीण योजना राबवित असताना दुसरीकडे लाडकी लेक सुरक्षित नाही. राज्याच्या तिजोरीची अवस्था लक्षात न घेता विविध निर्णय जाहीर करायचे यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था, राज्याचे अर्थकारण अडचणीत आले आहे. आता ठेकेदारही आंदोलनाच्या पवित्र्यात असून राज्यात महीला, मुलींच्या रक्षणाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या मतदानाचा अधिकार वापरून राज्यात सर्वच बाबतीत अपयशी ठरलेल्या सरकारमध्ये परीवर्तन करू असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले.

जेजुरी येथे विविध विकास कामांचा लोकार्पण आणि शुभारंभ देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत मंगळवारी ( दि ८ ) संपन्न झाले. याप्रसंगी खा शरद पवार यांनी, आताचे राज्य शासन ख-या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नाहित्या गोष्टींना महत्त्व देत आहे.

तिजोरीकडे लक्ष न देता निर्णय घेत असून आर्थिक अडचणीत येत असल्याचे सांगत खा शरद पवार यांनी, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते माझ्यापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्याचे अर्थकारण सांभाळत राज्याच्या विकासाकडे, सुधारणेकडे लक्ष दिले असे सांगितले. या सरकारने ठेकेदारांचे ४८ हजार कोटी रुपये थकवले असल्याने ठेकेदार आंदोलन करणार असल्याचे खा पवार म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी, पुरंदर हवेलीच्या विकासामध्ये आमदार संजय जगताप यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत संघर्षांच्या काळात पुरंदरच्या जनतेने दिलेली साथ मोलाची आणि कधीही विसरता येणार नाही असे स्पष्ट केले. जिल्हा नियोजनाच्या निधीमधून महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना डावलले जात आहे.

मात्र जनता हे पाहत असून मतदानातून व्यक्त होत आहे असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी, सर्वात जास्त शिक्षक, सर्वाधिक शेततळी पुरंदर तालुक्यात असून येथील सिताफळ, अंजिर, वाटाणा गोड आहे. पुरंदरच्या मातीतच हा गोडवा असून हा गोडवा टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे आवाहन केले.

याप्रसंगी प्रविण गायकवाड यांनी मनोगतातून ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा पुरंदर मतदार संघात आमदार संजय जगताप यांची विकासकामे चांगली आहेत. छत्रपती शंभूराजांचे जन्मस्थान असणाऱ्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमदार संजय जगताप यांनी वैयक्तिक १६ एकर जमीन शंभूराजांचे स्मारक आणि शिक्षण केंद्रासाठी दिली आहे असे सांगत कौतुक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, सुदामराव इंगळे यांनी मनोगत व्यक्त करून पवार साहेब सांगतिले त्याप्रमाणे वागू असे सांगितले.

आमदार संजय जगताप यांनी, खासदार शरद पवार यांच्या माध्यमातून सासवड, जेजुरीसह पुरंदरचा कृषी, औद्योगिक, नागरी विकास झाल्याचे सांगितले. राज्य सरकार ठेकेदार धार्जिणे, भ्रष्टाचारी असल्याची टिका केली. नगरविकास खात्याकडून शहरांचे विद्रूपीकरण होत आहे. जलजीवन योजनेत शंभर टक्के गावांचा समावेश असणारा पुरंदर तालुका एकमेव असून सासवड व जेजुरीच्या पाणी योजनाही जलजीवनच्या अमृत २ मधून करण्याची सातत्याने मागणी केली.

मात्र शासनाने त्यात योजना बसविल्या नाहीत आणि निवडणूकीच्या तोंडावर घोषणा करून श्रेयवादाचा प्रयत्न सत्ताधारी करीत असल्याचे सांगत सासवड आणि जेजुरीच्या पाणी पुरवठा योजनांसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि मी सातत्याने पाठपुरावा केल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, विजय कोलते, लिला गांधी, जयमाला काळे, हरीभाऊ कुदळे, नगराध्यक्षा विणा सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, माणिकराव झेंडे, अभिजित जगताप, संभाजीराव झेंडे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, नंदकुमार जगताप, अजिंक्य देशमुख, सचिन सोनवणे, बाळासाहेब दरेकर यांसह अनेक नागरीक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार खासदार वारसा चालवतात..
याप्रसंगी बोलताना खासदार शरद पवार यांनी पुरंदरच्या धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, कृषी, कला, सामाजिक, राजकीय परंपरेचा गौरव करत माजी आमदार बापूसाहेब खैरे विधीमंडळात ग्रामीण भागाच्या विकासासाठी ज्याप्रमाणे प्रश्न मांडायचे, चर्चा करायचे त्यांचा वारसा पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळे पुढे चालवित असून नवनवीन उपक्रम राबवितात याचा आनंद वाटतो असे सांगितले.

पुरंदरमध्ये साखर कारखाना उभारू…खा शरद पवार
आमदार संजय जगताप यांनी भाषणातून पुरंदर तालुक्यातील उसाच्या वाढलेल्या उत्पादनाबाबत दिलेल्या माहितीवर खा शरद पवार यांनी बोलताना, मी दहा वर्षे देशाची साखर कारखानदारी पाहत होतो. पुरंदरमधील वाढलेले ऊस उत्पादनाची दखल घेता पुरंदर तालुक्यात सर्वांच्या सहकार्याने सहकारी साखर कारखाना सहज उभारता येईल असेही खा शरद पवार याप्रसंगी म्हणाले.

Leave a Comment