कुलदैवत खंडोबा देवाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत भंडारा उधळून माउलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत.

Photo of author

By Sandhya

कुलदैवत खंडोबा देवाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत भंडारा उधळून माउलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत

महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत श्री संत शिरोमणी ज्ञानेश्र्वर महाराज पालखी सोहळ्याचे सायंकाळी 5 वाजता आगमन झाले. यावेळी जेजुरी नगरपालिका व जेजुरी देवसंस्थान व ग्रामस्थांच्या वतीने देवाचे लेण असणारा भंडार उधळून माऊली व वैष्णवांचे स्वागत केले.

यावेळी ज्ञानोबा माऊली बरोबर येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष वैष्णवांनी केला.
संत सोपान काकांच्या सासवड नगरीतील दोन दिवसांचा मुक्काम उरकून गुरुवार दिनांक 4 रोजी रोजी सासवड -जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती .

अभंगाच्या ओवीला टाळ -मृदंगाची साथ… खांद्यावर भगवी पताका… डोक्यावर तुळशीचे वृंदावन, पायांना लागलेली विठूमाऊलीची ओढ आणि वाटेवरचा असणाऱ्या कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाची ओढ घेवून भाविक रस्ता चालत होते,

सकाळी बोरावके मळा येथील न्याहारी नंतर दुपाई यमाईशिवरी येथील आदिशक्ती यमाईमातेचे दर्शन शिवरीकरांचे स्वागत व भोजन उरकून दुपारी पालखी सोहळा मल्हारी भेटीसाठी जेजुरी कडे मार्गस्थ झाला.

जेजुरी जवळ येताच व जेजुरीचा गड दिसताच .येळकोट ..येळकोट जयमल्हार” सदानंदाचा येळकोट असा गजर वैष्णवांच्या दिंड्यामधून होत होता. अनेक दिंड्यांनी खंडोबा देवाची गाणी अभंग म्हणत देवाचा जयजयकार केला.

वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी
अह्म वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरी वारी
सावध होवूनी भजणी लागा
देव करी कैवारी
वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी
बोध बुधली ज्ञान दिवटी
उजाळा महाद्वारी
एका जनार्दनी धन्य खंडेराव
त्यावर कुंचा वारी
वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी

असे संत एकनाथ महाराजांचे अभंग गात आणि भंडारा अंगावर घेत वैष्णव नाचत होता.

सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याने जेजुरीनगरीत प्रवेश केला.कडेपठार कमानी जवळ जेजुरी नगरपालिका ,जेजुरी देवसंस्थान व नागरिकांनी माउलींच्या रथाचे , पालखी सोहळ्यातील दिंड्याचे व वैष्णवांचे भंडारा उधळून आणि पुष्प वृष्टी करू स्वागत केले.

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या व ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठी असणाऱ्या नऊ एकराच्या भव्य पालखी तळावर संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा विसावला.समाज आरती झाल्यानंतर सोहळ्यात सहभागी झालेला वारकरी आपआपल्या तंबू कडे रवाना झाले.

त्यानंतर जेजुरी व परिसरातील हजारो भाविकांनी रात्री ११ वाजेपर्यंत रांगा लावून माउलींचे दर्शन घेतले. ..रात्री उशीरपर्यंत स्थिरावलेल्या दिंड्यामधून भजन -कीर्तन तर कुठे भारुडाचे स्वर आळवले जात होते.

माऊलींच्या या वारीत जेजुरी मध्ये शिव आणि वैष्णव भक्तीचा मिलाफ होतो .पहाटे पासून हजारो वारकरी बांधवांनी जेजुरी गड व कडेपठार गडावर जाऊन कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेतले. भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार या बरोबरच विठ्ठल व माऊलींचा जयघोष केला.

पालखी सोहळ्याचा दि. 5 रोजीचा मुक्काम वाल्मिकी ऋषींचे समाधीस्थळ असलेल्या वाल्हेगावी असणार आहे.

या सोहळ्या निमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जेजुरी नगरपालिका, जेजुरी देवसंस्थान , ग्रामीण रुग्णालय यांनी विविध सुविधा पुरविल्या.

Leave a Comment