
चाकण
पती बरोबर प्रेम प्रकरण चालू असल्याच्या संशयावरून पाच जणांच्या टोळक्याने संगनमताने दोन महिलांना शिवीगाळ व दमदाटी करत जमिनीवर लोळवून हाताने, लाथा बुक्क्यांनी तसेच कमरेच्या बेल्टने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण एमआयडीसीतील खराबवाडी (ता. खेड ) येथे एका इमारतीच्या पार्किंग मध्ये शुक्रवारी (दि.६) सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान ही घटना घडली. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी (दि.९) पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मारहाण झालेल्या महिलेने याप्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून महाळुंगे पोलिसांनी आकाश प्रकाश तायडे (वय ३०), त्याची आई व बहीण तसेच एका महिलेसह दोन अनोळखी इसम (सर्व रा. खराबवाडी, चाकण.) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, खराबवाडी येथे फिर्यादी महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या एका मुलीचे आणि आरोपी महिलेच्या पतीचे प्रेम संबंध सुरू असल्याचा आरोपींना गेल्या अनेक दिवसापासून संशय होता. तेव्हापासून ते सर्वजण चिडून होते. शुक्रवारी (दि.६) पाच जणांच्या टोळक्याने संगणमताने त्या मुलीला आणि फिर्यादी महिलेला शिवीगाळ दमदाटी करत हाताने लाथा बुक्क्यांनी तसेच जमिनीवर लोळवून कंबरेच्या बेल्टने जबर मारहाण केली. परत ही मुलगी इथे दिसली तर तिला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राम राठोड हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.