येरवडा कारागृहात दोन गटांमध्ये वर्चस्ववादातून तुंबळ हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्र्याने व दगडाने एकमेकांना मारहाण करत न्यायालयीन कैद्यांनी जखमी केल्याचा प्रकार घडल्यानंतर याप्रकरणी आता येरवडा पोलिस ठाण्यात 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत शांताराम येवले, विजय चंद्रकांत वीरकर, सचिन शंकर दळवी, मुकेश सुनिल साळुंखे, गणेश वाघमारे, आदित्य नानाजी चौधरी, किरण रमेश गालफाडे, सूरज प्रकाश रणदिवे, आकाश उत्तम शनिगारे, विशाल रामधन खरात, रूपेश प्रकाश आखाडे, रोहित चंद्रकांत जुजगर, शुभम गणपती राठोड, अनुराग परशुराम कांबळे आणि मेहबूब फरीद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तुरुंग अधिकारी हेमंत गोविंदराव इंगाले (33) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात गणेश वाघमारे, आदित्य नानाजी चौधरी, किरण गालफाडे, शुभम राठोड, सूरज रणदिवे हे जखमी झाले.
सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रकाश येवले, प्रवण रणधिकर, विजय वीरकर, सचिन दळवी, मुकेश साळुंखे, गणेश वाघमारे, आदित्य चौधरी, किरण गालफाडे हे बरॅक क्रमांक सहामधून बाहेर येऊन सूरज रणदिवे याला मारहाण करत होते.
त्या वेळी रणदिवेच्या गटातील आकाश शिनगारे, विशाल खरात यांच्यासह इतरांनीदेखील प्रतिहल्ला केला. यावेळी पूर्ववैमनस्यातून तसेच वर्चस्ववादातून एकमेकांना दगड व पत्र्याच्या तुकड्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यामध्ये काहीजण जखमी झाले. हा सर्व प्रकार सर्कल क्रमांक 3 येथे घडला. त्यानंतर कारागृहातील अधिकार्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मारहाणीत जखमी झालेल्या कैद्यांवर कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात आले.