
वारूळवाडी (ता. जुन्नर ) येथील डिंभे डाव्या कालव्यात काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पल्लवी चिराग शेळके (वय 24)व चिराग चंद्रशेखर शेळके (वय 28,दोघेही रा. अभंगवस्ती, वारूळवाडी ) या तरुण दांपत्याने उडी मारली. यापैकी चिराग शेळके यांचा मृतदेह कालव्यातून कालच रात्री बाहेर काढण्यात आला.अंधार पडल्याने पल्लवी शेळके यांचा शोध घेता आला नाही.
वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर म्हणाले, बुधवारी सायंकाळी वारूळवाडी ठाकरवाडी रस्त्याने जात असताना डिंभे डावा कालव्यावरील पुलावरून तरुण व तरुणीने उडी मारली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही पाण्याबरोबर वाहून गेले.याबाबतची माहिती मेहेर यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांना दिली.त्यानंतर घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, संतोष कोकणे, हवालदार काळुराम साबळे, पोलीस पाटील भुजबळ आले. स्थानिक तरुणांच्या मदतीने चिराग यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र पल्लवी यांचा मृतदेह कालरात्री अंधार पडल्याने त्यांचा शोध घेता आला नाही.आज सकाळी जुन्नर रेस्क्यू टीम, जुन्नर अग्निशामक दल व आपदा मित्र यांच्या पथकाला पल्लवी यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. या दाम्पत्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे