
खडकवासला येथील तिघांविरुद्ध गुन्हा
आरोपी तरुणीचे वडील API – अटकेबाबत चर्चेला उधाण
Youth commits suicide due to blackmail and mental torture
बारामती – बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात खडकवासला (पुणे) येथील तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपींपैकी एक आरोपी तरुणीचे वडील हे पुणे शहरात सहायक पोलीस निरीक्षक (API) पदावर कार्यरत असल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मयत विक्रम उर्फ बबलु नवनाथ कोळपे (वय 23, रा. बयाजीनगर, रुई, ता. बारामती, जि. पुणे) याने दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते 7.45 या वेळेत आपल्या राहत्या घरातील किचनरूममध्ये स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर त्यास तातडीने रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये विक्रमने एका तरुणीमुळे गेल्या पाच वर्षांपासून मानसिक छळ, धमक्या व ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागत असल्याचा उल्लेख केला आहे. संबंधित तरुणीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आपला भावनिक व आर्थिक वापर केल्याचा तसेच फोटो व चॅटिंगच्या आधारे धमकावल्याचा आरोपही या नोटमध्ये नमूद करण्यात आला आहे.
मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार,संबंधित तरुणी,तिची बहीण व वडील यांनी विक्रमला पुण्यात बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो व चॅट्स जबरदस्तीने डिलीट केले तसेच त्याला गंभीर परिणामांची धमकी दिली होती. विशेष बाब म्हणजे, आरोपी तरुणीचे वडील हे पुणे येथे API म्हणून कार्यरत असून,त्यांनीही फोनवरून दमदाटी व धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या बाबींची प्रथमदर्शनी माहिती तपासात समोर येत आहे.
या संपूर्ण प्रकरणात बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात सृष्टी विकास मते, श्रृती विकास मते व विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 108, 351(2), 351(3), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी एक पोलीस अधिकारी असल्याने अटकेबाबत कायदेशीर प्रक्रिया काय असणार, तसेच वरिष्ठ स्तरावरून काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून,सुसाईड नोट, मोबाईल डेटा,कॉल रेकॉर्ड्स व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.