
अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाची युगेंद्र पवार यांच्याकडून पाहणी पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी पाठपुराव्याचे आश्वासन
बारामती : अवकाळी पाऊस बारामती तालुक्याला अक्षरशः झोडपून काढत आहे. पवईमाळ, पणदरे, धुमाळवाडी आणि आसपासच्या परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची युगेंद्र पवार यांनी पाहाणी केली. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधत आणि त्यांना धीर दिला आणि नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा, करू, अशी ग्वाही त्यांना दिली.
वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी होत असलेल्या गारपिटीमुळे ऊसासह अन्य पिके आणि फळबागा भुईसपाट झाल्या असून, अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मेहनतीने पिकवलेले उबागे पीक शिवारांत आडवे झाले असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा संकटात सापडला असून त्याच्या डोळ्यात आज अश्रू दाटले आहेत. या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून तालुका प्रशासनाला करणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष ॲड. राजेंद्रबापू जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नुकसानग्रस्त शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.