अंधश्रद्धेचा अघोरी खेळ, खोट्या थापा मारून भोंदूबाबा भक्तांना पाजायचा लघवी….

Photo of author

By Sandhya

छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. येथील बिरोबा मंदिर परिसरात संजय रंगनाथ पगार या भोंदूबाबाने गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अघोरी कृत्ये केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, वैजापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

संजय पगार हा भोंदूबाबा ‘लग्न होत नाही, मूल होत नाही, भूतबाधा झाली आहे’ अशा खोट्या थापा मारून अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू लोकांना आपल्या जाळ्यात ओढत होता. बिरोबा मंदिर परिसरात तो मंत्रांचा जप, ढोलकी वाजवणे आणि ‘अलख निरंजन’ अशा आरोळ्या देत अघोरी कृत्ये करायचा. त्याच्या या कृत्यांमध्ये अनेक अमानुष प्रकारांचा समावेश होता. बाधित व्यक्तीला जमिनीवर झोपवून त्याच्या मानेवर पाय ठेवणे आणि पोटावर काठी ठेवून धमकावणे. तसेच व्यक्तीच्या तोंडात लघवी पाजणे आणि नाकाला बूट लावणे. भूतबाधेच्या नावाखाली लोकांना भीती दाखवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. या सर्व कृत्यांचा व्हिडीओ पुरावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला, ज्यामध्ये बाधित व्यक्ती निमूटपणे हे अत्याचार सहन करत असल्याचे दिसून आले आहे. हा धक्कादायक प्रकार १७ जुलै रोजी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आला. तक्रारदार किशोर शांताराम आघाडे (वय ४०, व्यवसाय-नोकरी) यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे तक्रार नोंदवली. व्हिडिओ पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संजय पगार याच्याविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सध्या तपास सुरू असून, पोलिसांनी आरोपीला लवकरच अटक करण्याचे संकेत दिले आहेत. वैजापूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अशा अंधश्रद्धेच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

भोंदूबाबाचा काळा चेहरा उघड

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करत संजय पगार या भोंदूबाबाचा काळा चेहरा उघड केला. त्यांनी स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. “लोकांनी अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकू नये आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारावा, असे समितीचे कार्यकर्ते आवाहन करत आहेत. त्यांनी शिऊर गावातील नागरिकांना अशा अंधश्रद्धाळू व्यक्तींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page