

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी हे गाव गेल्या काही वर्षांत पारंपरिक शेतीपासून रेशीम शेतीकडे यशस्वीरीत्या वळले असून, या प्रगत परिवर्तनाला अधिक गती देण्यासाठी व शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळावे यासाठी म्हसोबाच्यावाडीतच एकदिवसीय रेशीम उत्पादन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी भूषविले. यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे तसेच जिल्हा रेशीम अधिकारी संजय फुले उपस्थित होते.
चर्चासत्रास म्हसोबावाडी आणि परिसरातील 46 शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रेशीम उत्पादक शेतकरी मनोज चांदगुडे यांनी या उद्योगाची सुरुवात दोन-तीन शेतकऱ्यांपासून झाली असून आज सव्वाशेहून अधिक शेतकरी रेशीम व्यवसायात कार्यरत असल्याची माहिती दिली. अजिंक्य चौकी सेंटरचे प्रोप्रायटर अजिंक्य कांबळे यांनी चॉकी सेंटरचे महत्त्व आणि कीटक संगोपनातील तांत्रिक बाबी सविस्तर स्पष्ट केल्या.
रेशीम उत्पादक आबासाहेब सांगळे यांनी तुती वृक्षवाढीसाठी गोमूत्र व सेंद्रिय खतांचा वापर फायदेशीर असल्याचे सांगितले, तर बारामती तालुक्यातील अतुल घाडगे यांनी कीटकसंगोपन गृहातील तापमान व आर्द्रता नियंत्रणासाठी एच.ओ. तंत्रज्ञान उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन केले.
यावेळी डॉ. महेंद्र ढवळे यांनी तुती बाग व्यवस्थापन, खत नियोजन, चॉकी व प्रौढ कीटक संगोपन, रोग-कीड नियंत्रण तसेच कोश बाजारपेठ या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
यानंतर डॉ. ढवळे यांनी म्हसोबावाडीतील रेशीम उत्पादक स्वप्निल चांदगुडे यांच्या तुती बागेची आणि कीटक संगोपन गृहाची पाहणी करून उझी माशी नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दाखवले. रेशीम उद्योगाच्या प्रगतीसाठी गटशेती आणि पीकविमा योजना आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी चर्चेतून मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज चांदगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अण्णासाहेब चांदगुडे यांनी केले.